मानवी भाषांतराला सध्या कुठला पर्याय वापरला जात असेल, तर तो मशीन भाषांतरांचा म्हणजेच कॉम्प्युटरने केलेल्या भाषांतराचा. एखाद्या व्यक्तीला भाषांतर करायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कितीतरी कमी वेळात कॉम्प्युटरचे भाषांतर तयार होते. यामुळेच मशीन म्हणजेच कॉम्प्युटर्स भाषांतरकाराचे काम करायला लागले आहेत, भाषांतरकारांची आत गरजच काय वगैरे चर्चा ऐरणीवर आल्या आहेत. पण या भाषांतरात नक्की काय फरक आहे, भाषांतराचे भविष्य काय आहे, या मुद्द्यांवर जरा सखोल विचार करू या.
मानवी भाषांतर
जेव्हा एखादी व्यक्ती भाषांतर करत असते तेव्हा तिला त्या भाषेतील प्राधान्ये, वाक्प्रचार, म्हणी, उपहास आणि विनोद अशा अनेक अंगांचे ज्ञान असते. मनुष्य हा आपल्या संस्कृतीबद्दल आणि त्यातील विसंगतीबद्दल कमालीचा जागरूक आहे. त्यामुळे या सर्व अंगांचे ज्ञान भाषांतरकाराला असणे अतिशय गरजेचे असते.
आपण एक उदाहरण पाहू. मराठीमध्ये एक म्हण आहे – “अंथरूण पाहून पाय पसरावे’’ (Anthrun pahun pay pasrawe). याचं जेव्हा बॅक ट्रान्सलेशन म्हणजेच मशीनकडून आलेलं भाषांतर होतं – तुमच्या अंथरूणावर पाय पसरा (Spread your legs over the bed). त्याचा खरा अर्थ होतो, जेवढी क्षमता असेल, तेवढीच कृती किंवा कार्य करावे.
वर दिलेल्या उदाहरणामध्ये मशीन भाषांतराचा आधार घेतला, तर शब्दशः अर्थ प्राप्त होतो. ज्याचा त्या मूळ म्हणीशी काहीही संबंध उरत नाही. वरील म्हणींचा ज्या संस्कृतीमुळे उगम झाला त्याच्याशी अशा शब्दशः भाषांतराचा संबंध उरत नही.
यासारख्या काही उदाहरणांमध्ये मशीन भाषांतरात त्रुटी, संदिग्धता, गैरसमज आणि चुकीचा अर्थ लागतो.
मशीन भाषांतर
मशीन भाषांतर अर्थात कॉम्प्युटरने केलेल्या भाषांतराचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेग. गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट यांनी भाषांतरासाठी तयार केलेली टूल्स एका सेकंदात कोणत्याही शब्दाचे किंवा वाक्याचे भाषांतर करतात. याच वेगामुळे अनेक व्यवसाय अशा प्रकारच्या वेगवान भाषांतराला प्राधान्य देतात.
वेगाबरोबरच मशीन भाषांतराचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे कमीत कमी खर्चात भाषांतर उपलब्ध होते. आजच्या घडीला वेग आणि कमी खर्च या दोन कारणांमुळे अनेक व्यावसायिक किंवा भाषा सेवा पुरवणारे व्यावसायिकही मशीन भाषांतराला प्राधान्य देऊ लागले आहेत.
मानवी भाषांतर की मशीनने केलेले भाषांतर?
मानवी भाषांतर की मशीनने केलेलं भाषांतर, नक्की कशाला प्राधान्य द्यायचं? हा वाद तसा काही काळापासून सुरू झाला आहे. ऑटोमेशन म्हणजेच स्वयंचलित भाषांतराचा भाषांतर उद्योगात शिरकाव झाल्यापासून अशा प्रकारच्या चर्चा फारच घडू लागल्या. नेमकं कोणत्या प्रकारच्या भाषांतराचा दर्जा उत्तम आहे याकडे बरेचदा चर्चेचा कल असतो.
मशीन म्हणजेच कॉम्प्युटरद्वारे केलेले भाषांतर कसे होते? तर एका भाषेतून दुसऱ्या भाषेतील शब्दाला प्रतिशब्द मशीनद्वारे सुचवला जातो. त्यात सुसूत्रता असतेच असे नाही. परंतु मशीनने केलेल्या भाषांतराचे भाषांतरकाराने पुनरावलोकन केले तर त्यामध्ये नक्की फरक पडू शकतो. MT (Machine Translation) फसू नये यासाठी भाषांतरकाराचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरतो तो यामुळेच.
मशीन भाषांतरातील मार्केट ट्रेंड
2020 साली मशीन भाषांतराचे मार्केट 153.8 दशलक्ष यूएसडी इतके होते, तर 2026 सालापर्यंत हे मार्केट 230.67 दशलक्ष यूएसडी इतके जाईल. ही वाढ 2021 ते 2026 दरम्यान 7.1% सीएजीआरशी संबंधित आहे.
वाढत्या जागतिकीकरणामध्ये ज्याला वेगवान आणि कमी प्रभावी भाषांतर चालते, त्यांच्याकडून लोकलायझेशन क्षेत्राकडे अशी मागणी नोंदवली जाते. त्यांची ही गरज कॅट (कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले भाषांतर) साधनांच्या व्यापक वापराद्वारे पूर्ण केली जात आहे.
या साधनांद्वारे सर्वोत्तम दर्जा आणि अचूक भाषांतर मिळवता यावे यासाठी संबंधित मशीन लर्निंग मॉडेल्समध्ये सुधारणाही करण्यात येत आहेत.
मशीन भाषांतर क्षेत्रातील आणखी एक चांगला विकास म्हणजे न्यूरल मशीन ट्रान्सलेशन्स (NMT) ची प्रगती. एकाच युनिफाइड मॉडेलमधील शब्द, वाक्ये आणि वाक्यांमधील सातत्याचा अंदाज घेण्यासाठी अशा प्रकारचे ऑटोमेशन कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करते.
मशीन भाषांतरातील अलीकडील ट्रेंडसह, जागतिक उद्योगातील बहुतेक महत्त्वपूर्ण कंपन्या नवीन मार्केटमध्ये टॅप करून आपली उपस्थिती वाढवत आहेत.
मशीन भाषांतराचे तोटे
- मशीनला भावना, सांस्कृतिक संदर्भ, परिस्थिती यासारख्या शाब्दिक गोष्टी समजत नाहीत.
- मशीन भाषांतरात संदर्भाला महत्त्व दिले जात नाही.
- मशीन भाषांतर 100% अचूक नसते.
- भाषेमध्ये विविध प्रकारे व्याकरण आणि शब्दार्थ वापरले जातात, एखादी संकल्पना व्यक्त करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला जातो. मशीनला भाषांतर करताना हा फरक करता येत नाही.
निष्कर्ष
मशीन अल्गोरिदम वापरून कार्य करतात, तर मानवी भाषांतरात भाषिक आणि सांस्कृतिक सीमा अधिक स्पष्ट असतात.
मशीनला भाषेतील बारकावे, संवेदना समजणं शक्य नसतं, तर मानवी भाषांतरात ते पुरेपूर उतरतं.
आम्ही भाषांतराची गुणवत्ता आणि अचूकता पाहतो. मशीनला अद्याप या गोष्टी साध्य नसल्याने, मशीनला या क्षेत्रावर ताबा नजीकच्या काळात तरी मिळवता येणार नाही.
July 29, 2021 — magnon