“ताई मी संडेला येनार नाईये कामाला.. माझ्या पोराच्या स्कूलमध्ये मिटिंग ए..’’
मदतनीस मंजूताईंचा निरोप कानावर पडला आणि कौतुक वाटलं. मंजूताई मराठी जेमतेम शिकलेल्या. पण हे असे संडे, स्कूल, मिटिंग असे अनेक शब्द त्यांच्या रोजच्या वापरात सहज यायचे. विचार केला की, हे आणि यासारखे टीव्ही, मोबाईल, प्रिंट आऊट, टेबल, गेट, बुकं, फॅन, बॉटल असे अनेकानेक शब्द आपल्या भाषेत कधी आणि कसे रुजले. ते प्रत्येक स्तरापर्यंत कसे पोचले, कसे स्वीकारले गेले असावेत?
असा विचार करताना जाणवलं, भाषा प्रवाही आहे. ती वळवावी तशी वळते असं म्हणतात. त्यामुळेच हे झालं असावं का?
महाराष्ट्रात आपण सगळेच जण मराठी बोलतो. पण ती अजिबातच एकसारखी नसते. कुणाच्याही बोलण्याच्या शैलीवरून ती व्यक्ती मुंबईची आहे की नागपूरची, सोलापूरची आहे की कोल्हापूरची, नाशकाची आहे की सांगलीची ते कळतंच. बोलण्याचा लहेजा वेगळा असतोच, पण अन्य भाषेच्या आणि भाषेतल्या शब्दांच्या वापरावरूनही ते सहज लक्षात येतं.
कोल्हापूरकरांच्या भाषेत अनेक उर्दू शब्द डोकावतात, विदर्भातील लोकांच्या भाषेवर मध्यप्रदेशातल्या हिंदीचा खूप पगडा आहे. मुंबईची हिंदी, इंग्रजीमिश्रित मराठी तर आणखीनच वेगळी. प्रत्येक बोलीभाषेवर आसपासच्या वातावरणाचा प्रभाव होतो तो असा.
आता याचंच एक उदाहरण पाहू.
लग्न करून आलेली कोल्हापूरची तरुणी गिरगावातल्या चाळीत नळावर पाणी भरायला गेली.
“ओ काकी, ही चावी उघडायची कशी?’’ तरुणीने शेजारच्या बाईला प्रश्न विचारला आणि उत्तराची वाट पाहत बसली.
काकींना काही समजेच ना. ही मुलगी कसल्या चावीबद्दल बोलतेय ते त्यांना कळेच ना.
शेवटी त्यांनी विचारलंच, कुठल्या घराची चावी.. तेव्हा कुठे सगळ्यांना कळलं, चावी म्हणजे नळ. कोल्हापुरात त्या मुलीकडे नळाला चावी म्हणत असतं. सगळ्या बायका खो-खो हसल्या आणि ती तरुणी बिचारी ओशाळली. पण तिने आपल्या मनात नळ असा नवा शब्द अॅड करून टाकला असणार हे नक्की.
पूर्वी अगदी ऐंशीच्या दशकातली लोकं वापरत असलेल्या खटका, दिवा, दार, बाटली, कपाट अशा अनेक शब्दांना अल्पावधीतच दुसऱ्या भाषेतले प्रतिशब्द आले. बटण, लाइट, गेट, डोअर, बॉटल, कबोर्ड, कप, गॅस, बॅग, जॅकेट असे कितीतरी इंग्रजी शब्द आपण आपल्याच भाषेतले समजून वापरायला लागलो. आज कितीतरी शब्द असे आहेत की, मूळ शब्द आठवून वापरायचं म्हटलं तरी ते शक्य होईलच असं नाही.
भाषा हे संवादाचं माध्यम आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अशी भाषा काळाप्रमाणे नक्कीच बदलत जाणारी असते हेही गृहित धरायला हवं. आपली भाषा आपली असते, ती आपण रोजच्या जगण्यात वापरत असतो आणि त्यामुळेच तिच्यातल्या बदलांसकट आत्मसात करत असतो.
आज शिक्षणाची भाषा बदलत चालली आहे. मराठी माध्यम, मग सेमी इंग्लिश करता करता आता शाळा पूर्णपणे इंग्रजी माध्यमांच्या झाल्या आहेत. घरात रोजच्या वापराची भाषा मराठी असली, तरी शिक्षणाची भाषा वेगळी आहे. मनोरंजनाची भाषाही केवळ हिंदी, इंग्रजी राहिलेली नाही. जगभरातले सिनेमे, प्रादेशिक सिनेमे पाहता पाहता त्यातले अनेक शब्द माहीत झालेले आहेत. बदलत्या पिढीने ते केव्हाच आत्मसात केलेले आहेत.
भाषेच्या बदलाबाबत हा सगळा विचार करतानाही, एक गोष्ट आवर्जून इथे मांडावीशी वाटते. ती म्हणजे प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत संवाद साधण्यात प्रचंड आनंद मिळतो. म्हणूनच अनेक टीव्ही चॅनल्स, ऑनलाइन पोर्टल्स, मोबाइल फोनमधील अॅप्स, विविध उत्पादनांच्या वेबसाइट्स आणि त्यांचे ग्राहक एकमेकांना पूरक होण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक व्यवसाय माध्यमांनी आता आपल्या ग्राहकाला आवडेल, रुचेल, पटेल असा त्यांच्या भाषेत संवाद साधायला प्राधान्य दिलं आहे ते याचसाठी.
भाषा, बदलली जाहिरातींच्या, माहिती देण्याच्या अनेक पद्धतीही बदलल्या. पण उद्दिष्ट मात्र बदललेलं नाही. आपल्या ग्राहकाशी संवाद साधणं, सहज-सोप्या पद्धतीने माहिती देणं हा एकमेव हेतू उत्पादकाचा असतो. त्यासाठी ती माहिती कोणत्या भागात जाणार आहे, कुठल्या ग्राहकापर्यंत पोचणार आहे, त्या प्रदेशातल्या ग्राहकाची भाषा शैली कशी असणार आहे अशा अनेक गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे उत्पादकाला संहिता बनवाव्या लागतात. त्यात कमीअधिक प्रमाणात बदल करावे लागतात.
परंतु हे बदल करणं म्हणजे भाषांतर नव्हे. त्यात स्थानिक गोष्टी लक्षात घेऊन मूळ हेतूला धक्का न लावता संवाद साधणं जमायला हवं. अन्यथा अन्य भाषाषैली, भाषेतील शब्द जसेच्या तसे वापरल्यानं जाहिरात नेमकी होण्याऐवजी हास्यास्पद होते आणि कंपनीच्या उत्पादनाला त्याचा फटका बसतो.
दुसरी आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा सोपी, सुटसुटीत असणं अत्यंत गरजेचं असतं. यामुळेच भाषाबदल करताना त्यात उगाचंच आधी वापरले जात होते तसे क्लिष्ट, न समजणारे शब्द वापरण्याचा अट्टहास होता कामा नये.
आजची पिढी सोशल मीडियावरची ऑनलाइन पिढी आहे. आवडलं तर ठीक नाहीतर झरझर पुढे जायला या पिढीला वेळ लागत नाही. काही सेकंदांमध्ये मजकूर आवडला नाही, रुचला नाही, त्रासदायक वाटला तर त्यावर सहज फुली मारता येते. कारण मुळात स्पर्धा खूप आहे आणि संपूर्ण नियंत्रण ग्राहकाच्या हातातल्या मोबाईलमध्ये सामावलेलं आहे. त्यांची आवड-निवड लक्षात घेऊन आपल्याही संहिता तशाच प्रकारे बनवणं म्हणूनच आज गरजेचं झालंय.
एकच मजकूर विविध भाषिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी भाषांतर हा एक प्रकार झाला. पण एका भाषेतला संदर्भ किंवा संहिता जशीच्या तशी नुसते भाषांतर करून ग्राहकांपर्यंत पोचवल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतात. मजकुराला असलेले वेगवेगळे कोन ठरावीक भाषिक ग्राहकापर्यंत पोचतीलच असं नाही. शब्दप्रयोग, थेट भाषांतर, शब्दशः भाषांतर यामुळे उत्पादनाला जो प्रतिसाद अपेक्षित आहे तो मिळणार नाही. फिक्शन प्रकारातील साहित्याचं भाषांतर करणं, स्वैरानुवाद करणं हा वेगळा प्रकार आहे. त्यासाठी भाषांतरकाराला वेगळे नियम पाळावे लागतात. या प्रकारात काम करताना भाषांतरकाराला वाचकाच्या प्रदेशानुसार येणाऱ्या मर्यादा साधारणपणे माहीत असतात. परंतु नॉन-फिक्शन प्रकारासाठी तोच नियम लागू होत नाही. त्यामुळेच भाषेत रुळलेले अनेक शब्द आत्मसात करून, त्यांचे संदर्भ तपासून, तरुण आणि जुन्या पिढीसाठी भाषेची योग्य ती सांगड घालून मजकूर किंवा संहिता तयार करणं, ती पोहचवणं हे वेगळ्या शैलीतलं काम आहे.
एखादं भाषांतर किंवा एखादी जाहिरात, एखाद्या वेबसाइटवरचा मजकूर आपण चांगला आहे किंवा अत्यंत वाईट आहे असे शेरे देत असतो. एखादं अॅप आपल्या मातृभाषेत वापरताना अपयश येत असेल तर आपण पुन्हा इंग्रजीसारख्या भाषेचाच आधार घेत असतो. पण असे शेरे आपण केव्हा मारतो, मजकूर चांगला आहे किंवा वाईट हे आपण काही सेकंदांमध्ये केव्हा ठरवतो? त्याचं निरीक्षण केल्यास नवीन भाषेचा आपल्यावर झालेला परिणाम आपल्या लगेचच लक्षात येईल.
March 26, 2021 — magnon