मानवी उत्क्रांतीबरोबरच वेगवेगळ्या भाषांची निर्मिती झाली. व्यापार तसेच साम्राज्यविस्तार याच्या निमित्ताने एकमेकांशी संबंध आल्यानंतर मनुष्याला दुसरी भाषा शिकण्याची गरज जाणवली असावी.
आठव्या शतकातील रोमन सम्राट किंग चार्ल्स याने ‘दुसरी भाषा येणे म्हणजे दुसरा आत्मा असल्यासारखे आहे’, असे म्हटले होते. किंग चार्ल्स यांच्यासारखीच भावना तेराशे वर्षानंतर प्रसिद्ध इंग्रजी कवी जेफ्री विल्यम्स यांनी व्यक्त केली होती. विल्यम्स यांना दुसरी भाषा शिकण्याचे महत्त्व समजले होते. ‘एक भाषा चांगली येण्यासाठी तुम्हाला दोन भाषा येणे आवश्यक आहे’ या शब्दात त्यांनी दुसरी भाषा शिकण्याचे महत्त्व सांगितले होते.
संशोधन काय सांगते?
दुसरी भाषा शिकण्याचे महत्त्व वेगवेगळ्या संशोधनातूनही समोर आले आहे. दुसरी भाषा शिकल्याने मेंदूची क्षमता वाढते असा निष्कर्ष डॉ. व्हिओरीका मारियान आणि ॲन्थोनी शुक यांच्या संशोधनातून समोर आला होता. (१) बहुतेक जण दुसरी भाषा बोलत असतानाही मातृभाषेत विचार करतात. दुसरी भाषा बोलताना एकाच वेळी दोन भाषेत आपले चिंतन सुरू असते. एका भाषेत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलण्याची सवय एका कामातून दुसऱ्या कामावर स्विच करताना उपयोगी पडते. लहान मुलांमध्येही अशी सहज स्विच होण्याची क्षमता असते. लहान मुलांची वाढ द्वैभाषिक वातावरणात झाली, कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासमोर जाणीवपूर्वक एकापेक्षा जास्त भाषांचा वापर जाणीवपूर्वक केला, तर त्यांना अन्य भाषाही सहज आत्मसात करता येतात. दुसरी भाषा शिकणे हे लहान वयातच नाही तर मोठेपणीही तितकेच उपयोगी ठरते. शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या प्रदेशात/देशात गेलेल्या व्यक्ती त्या भाषा शिकतात. स्थानिक भाषा शिकल्यानंतरच ते त्या प्रदेशाशी/देशाशी खऱ्या अर्थाने समरस होतात. इतकेच नाही, तर दोन भाषा येणाऱ्या व्यक्तींना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता ही एक भाषा येणाऱ्या व्यक्तींच्या तुलतेन कमी असते असा निष्कर्षही याच संशोधनातून समोर आला आहे.
सामाजिक फायदा
दुसरी भाषा शिकल्याने आपले संभाषण कौशल्य सुधारण्यातही मदत होते. यामुळे आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे आणि तिचे मत जाणून घेणे अधिक सोपे होते. काही शब्द हे त्या भाषेपुरतेच मर्यादित असतात, एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संस्कृती, विचार यांमधून त्यांची उत्पत्ती झालेली असते. त्यामुळे आपण नवी भाषा शिकताना आपण केवळ त्या भाषेतील शब्द आत्मसात करत नाही, तर भाषिक संस्कृतीही आत्मसात करत असतो. एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या आपल्या जडणघडणीमध्ये याचा मोठा फायदा होतो. भाषेतील शब्दांमध्ये विविधता असली, तरी अनेक गोष्टींमध्ये समानता आहे, हे देखील यामधूनच समजते. यातून दोन भिन्न घटकांमधील सामाजिक अंतर नाहीसे होते.
नोकरीच्या संधी
आजच्या स्पर्धेच्या युगात दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा येणे ही एक नेहमीच जमेची बाजू धरली जाते. यामुळे तुमचा नोकरीचा अर्जही अन्य उमेदवारांपेक्षा उठून दिसतो. एखाद्या उमेदवाराला भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी कंपनी बहुभाषिक उमेदवाराला जास्त प्राधान्य देते. लोकलायझेशन उद्योगाप्रमाणे अन्य क्षेत्रातही बहुभाषिक असण्याचा मोठा फायदा होतो. दुसरी भाषा येण्याचा मोठा फायदा होतो अशी दोन उदाहरणे पाहू या…
आदरातिथ्य/पर्यटन
या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांशी संबंध येतो. यापैकी काही ग्राहक केवळ एकच भाषा बोलण्यास पसंती देणारे असतात. अशा ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी बहुभाषिक कर्मचाऱ्यांचा मोठा उपयोग होतो. ग्राहकांना हव्या त्या भाषेत माहिती दिल्यास/ त्यांचे आदरातिथ्य केल्यास त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते, आणि त्यामुळे कंपनीचाही मोठा फायदा होतो.
पत्रकारिता
एखाद्या वृत्तसंस्थेसाठी परराज्यात किंवा परदेशात विशेष प्रतिनिधी म्हणून काम करताना तेथील स्थानिक भाषा येणे हे एखाद्या पत्रकारास खूप उपयोगी ठरू शकते. पत्रकाराला स्थानिक भाषा येत असेल, तर त्याचे त्या प्रदेशातील ‘सोर्स’ लवकर तयार होतात. सामान्य नागरिकांशीही संवाद साधण्यात, तसेच त्यांच्या नेमक्या भावना समजून घेण्यातही स्थानिक भाषेचा मोठा फायदा होतो. बातमीचा दर्जा आणि विश्वासार्हताही वाढते.
एव्हाना दुसरी भाषा शिकण्याचे महत्त्व तुम्हाला पटले असेलच. आणखी कोणत्या कारणासाठी दुसरी भाषा शिकणे आवश्यक आहे? तुम्हाला दुसरी भाषा शिकण्याचा काय फायदा झाला? तुमचे याबद्दलचे अनुभव कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडून येणारी प्रत्येक प्रतिक्रिया ही आमच्यासाठी मोलाची आहे.
संदर्भ :
[1] Marian, V., & Shook, A. (2012). The cognitive benefits of being bilingual. Cerebrum : the Dana forum on brain science, 2012, 13.
December 24, 2018 — magnon