शाकाहारी असणं हे आपल्याकडे विनाकारणच आध्यात्मिकता, प्रासादिकता, शुद्धता, सात्विकता, वगैरेशी जोडलं गेलं आहे. वास्तविक वांग्याचं भरीत आवडतं म्हणून एखादा ते खातो आणि एखाद्याला आवडत नाही म्हणून तो खात नाही; इतकाच शाकाहारी – मांसाहारी हा विषय सोपा आणि सुटसुटीत असायला हवा. पण त्याभोवती अवघ्या अध्यात्माची गुंफण केली गेल्यामुळे अनेक शाकाहारींना आपण जरा विशेष सात्विक असल्याचा भास होत असतो आणि त्यांच्यासाठी मांसाहार हा ‘शीsss’ असतो. या ‘शीsss’ची शिटावळ त्यांच्या डोक्यातून धुऊन काढण्यासाठीच इथे चार गोष्टी लिहाव्याशा वाटतात.
मुळात निव्वळ मांसाहारी असा माणूस या जगाच्या पाठीवर अस्तित्वाच नाही. माणूस एकतर शाकाहारी असतो किंवा ‘मिश्र आहारी’. मांसाहारींच्या जेवणातही कोंबडीच्या रश्श्यासोबत पोळी, भातच असतो. मात्र माणूस हा मूलत: शाकाहारी प्राणी आहे आणि त्याने मांसाहार करणे, हे अनैसर्गिक आहे, असा गैरसमज हेतुपुरस्सर शाकाहाराच्या भोक्त्यांकडून पसरविला जातो. त्यांना हे ठासून सांगावस वाटतं, बाबांनो! आदिम काळापासून माणूस हा प्राणी मिश्र आहारीच होता. भटक्या अवस्थेत जगताना, शिकारीतून मिळणारं मांस आणि कंदमुळं हेच त्याचं प्रमुख खाद्य होतं. आजही माणसाचा पूर्वज मानला गेलेला वानर हा प्राणी किडेही खातो आणि झाडपालाही. माणसाबरोबर सहस्रावधी वर्षांपासून राहणारे कुत्रा, मांजर आदी प्राणीसुद्धा असेच मिश्रआहारी आहेत. आज उत्क्रांत होऊन सहस्रावधी वर्षं लोटल्यानंतरही माणसाचे पुढचे काही दात हे दाढेच्या दातांपेक्षा वेगळे आणि मोठे- टोकदार असतात, गाई-म्हशींसारखे एकसारखे नसतात. हाही माणसाच्या नैसर्गदत्त मिश्र आहारी असण्याचा पुरावाच आहे. याच मंडळींकडून असंही पसरविलं जातं की, आयुर्वेदामध्ये मांसाहार निषिद्ध मानला गेला आहे. हाही धादंता खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार आहे. उलट आयुर्वेदाने अनेक आजारांमध्ये मांसाहारामुळे होणारे लाभ अधोरेखित केले आहेत, हे मला आयुर्वेदात एमडी करणाऱ्या माझ्या एक मैत्रिणीने सांगितलं. प्राचीन हिंदू संस्कृतीमध्येही मांसाहार निषिद्ध मानला गेलेला नाही. उलट देवासमोर विविध पशुपक्ष्यांचे बळी देऊन त्यांचे मांस प्रसाद स्वरूप वाटण्याचे प्रकार आजही आपण अनेक मंदिरांमध्ये पाहातो.
मला एका गोष्टीचं कायमच आश्चर्य वाटत आलं आहे की, राम नवमीला मांसाहार नको, कृष्णाच्या देवळात मांसाहार करून जाऊ नका, असं सोवळं पांघरणारे किंवा मांसाहार करणाऱ्यांबाबत मनात किंतु बाळगणारे लोकं मुळात प्रभू श्रीरामच शाकाहारी नव्हते, हे का लक्षात घेत नाहीत. वाल्मिकी रामायणात वालीवधाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीरामांनी शिकारीचं समर्थन केलं आहे, वालीची शाखामृग अशी संभावना केली आहे. राम हरीण मारायला गेले असतानाच सीतेचं अपहरण झालं, याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं.
शाकाहारामुळे बुद्धी शांत राहते, बौद्धिक क्षमता वाढते, सात्विकता येते, हा आणखी एक अपसमज. अहो ज्यांनी जीवावर बेतले असतानाही शांतीचीच शिकवण दिली आणि त्यानुसार आचरण केलं, ते जगभरात शांतीदूत मानले गेलेले येशु ख्रिस्त आणि भगवान गौतम बुद्ध हे दोन्ही महापुरुष शाकाहारी नव्हते. बुद्धांचे महापरिनिर्वाण तर डुकराच्या शिळ्या मांसातून विषबाधेने झाल्याचं मानलं जातं. त्याउलट लाखो लोकांचा नृशंस संहार करणारा क्रूरकर्मा हिटलर हा शाकाहारी होता. त्याचं प्राणीप्रेम इतकं पराकोटीचं होतं की, पशुअत्याचार प्रतिबंधक कायदा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा हिटलरने केला. जगभरात हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे आधुनिक तपस्वी आणि ज्यांच्या अजोड बौद्धिक क्षमतेचं कायम उदाहरण दिलं जातं ते स्वामी विवेकानंदही अजिबात शाकाहारी नव्हते. तारुण्याच्या काळात तर ते नाश्त्याला दोन-दोन, चार-चार बोकडांच्या मुंड्या फस्त करीत असत.
मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन पोटाची दफनभूमी करू नका, अशा पाट्या वाचण्यात येतात, तेव्हा विचारावस वाटतं की, तुम्ही शाकाहार करता म्हणजे काय पोटाची कचराकुंडी करता की काय? कारण मेलेले प्राणी पुरून किंवा जाळून टाकतात, तसा छाटलेला झाडपाला कचरापेटीत किंवा उकीरड्यावर टाकण्यात येतो. कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते आणि आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहातो, यावरच त्याचं मूल्यमापन होतं. आता हेच बघा ना, ताटात वाढलेलं अन्न हे पूर्णब्रह्म, म्हणून आपण त्याला वंदन करत असतो. पण तेच ताटाबाहेर सांडताक्षणी खरकटं ठरवून त्याज्य मानतो. हा साधा साक्षेप, या अतिरेकी शाकाहारवाद्यांकडे नसतो, याचंच आश्चर्य वाटतं.
मध्यंतरी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होती. म्हणे, मांस-मच्छीला स्वत:ची चव अशी नसतेच; त्यात पडणाऱ्या मसाल्यांमुळे काय ती त्यांना चव येते, बाकी सर्व प्रकारचे मांस काय, मासे काय सारखेच. साहाजिकच या पोस्टचा कर्ता अतिरेकी शाकाहारवादीच असला पाहिजे. कारण ज्याला मांसाहाराची चव माहिती आहे, तो असली बालिश विधानं कधीच करणार नाही. या महाभागांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, सगळ्या मांस-मासळीची चव जर सारखीच असते, तर त्यांच्या किमतीत इतका फरक का? मांदेली-बोंबलाचा वाटा १०० रुपये आणि पापलेटची जोडी हजार रुपये असे का? बॉयलर कोंबडी १५०-२०० रुपये किलो आणि बोकडाचे मांस ५०० रुपये हा भेद का? हे मांस विकणारे चापलूस आहेत की विकत घेणारे खवय्ये मूर्ख आहेत. तव्यावर परतण्यात येणाऱ्या माशांच्या वासावरून जिथे अस्सल खवय्याला ते सुके बोंबील आहेत, बांगडा आहे की रावस –पापलेट हे ओळखता येतं किंवा मटणाच्या रश्श्यावर सुटणाऱ्या तेलाच्या तवंगावरून ते कोवळ्या बोकडाचं आहे, बॉयलर कोंबडीच आहे की गावठीचं हे कळतं; तिथे सगळ्या मांसाहाराची चव सारखीच असते हे मांसाहार न करताच ठोकून देणाऱ्या या महाभागांच काय करायचं! मांस आणि विशेषत: माशांना दुर्गंध येतो, म्हणून ते ‘शीsss’ आहेत. असं म्हणणाऱ्यांना सांगवस वाटतो, ताज्या माशांना दुर्गंध येत नाही, तर उग्र वास येतो. पण शेपूच्या भाजीचा वास काय कमी उग्र असतो? जेवणात वापरता तो हिंग काय उग्र नसतो? आणि मासे खराब झाल्यावर दुर्गंध येतो म्हणाल, तर तो टवटवीत असताना सुगंधी असणाऱ्या फुलांनाही येतो. पटत नसेल, तर बाजार उठल्यावर दादरच्या फुल मार्केटमधून फेरफटका मारून बघा. कोणता दुर्गंध सुसह्य, कोणता असह्य हे आपल्या सवयी किंवा सोयीवरून ठरत असतं.
मांसाहारामुळे हिंसा होते, असा ओरडा करणारे झाडपाल्यालाही जीव असतो हे विसतात की काय? आणि शेतात अनेक प्रकारचे जीवजंतू, प्राणी हे कीटकनाशकं आणि कृमीनाशकं फवारून मारण्यात येतात. त्यानंतरच आपल्याला हवा असणारा भाजीपाला उपलब्ध होत असतो. अनेक झाडांच्या मुळात खराब झालेले मांस-मासे खत म्हणून पुरले जातात. शिवाय आपण घेत असलेल्या विविध प्रकारच्या औषधांवर ती शाकाहारी असल्याचे (खाद्यपदार्थांच्या पाकिटांप्रमाणे) नमूद करण्यात येत नाही. आताआता कुठे सौंर्द्यप्रसाधनांवर ते नमूद करण्यात येऊ लागलं आहे. यकृतासंबंधी बहुतांश औषधांमध्ये माशाचं तेल हटकून वापरण्यात येतं. अन्य कोणत्याही जिवाची कोणतीही हानी न करता, आजवर कुणालाही जगता आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला खाद्य मिळविण्यासाठी अन्य कुणाचा तरी बळी घेणं हा माणसाचाच नव्हे, तर सर्वच सजीवांचा स्वभाव आहे. असे बळी न घेता आपण कसं जगलो, हे भासवून सात्विकता मिरवणारे बऱ्याचदा दांभिक असतात.
हा सगळा लेखन प्रपंच शाकाहारी असणाऱ्यांच्या मनात मांसाहाराबाबत आकर्षण निर्माण करण्यासाठी किंवा मांसाहाराचा प्रचार- प्रसार करण्यासाठी मुळीच नाही. मुळात शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या संस्था-संघटना आहेत, पंथोपंथ आहेत. तशा मांसाहाराच्या प्रचारासाठी असल्याचे माझ्या ऐकीवात नाही. तशा संस्था नाहीत, यातच मांसाहाराचे स्वाभाविकपण किंवा निसर्गसंमतता आहे. ज्या गोष्टी नैसर्गिक नसतातच, त्याच अशा प्रयत्नपूर्वक आणि पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. जसे की संस्कार; निसर्गत: प्राणी म्हणून जन्मणाऱ्या भय-भूक-निद्रा-मैथुन यांना बांधलेला असलेल्या माणसाला समाज धारणेच्या गरजेसाठी संस्कारी केलं जातं. आणि मग मला कसं वागायचयं यापेक्षा कसं वागलं पाहिजे याचा विचार करूनच तो आयुष्याच्या अखेरपर्यंत जगतो. हे ज्याला जितकं जास्त जमतं, तितका तो अधिक ‘चांगला माणूस’ ठरतो आणि ज्याला जमत नाही, तो दुराचारी! समाजधारणेसाठी अत्यावश्यक त्या ठिकाणी उपजत प्रेरणांना मुरड घालायलाच हवी, कारण त्याबदल्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा भागविल्या जाण्याची हमी समाजव्यवस्थेकडून मिळते किंवा मिळाली पाहिजे. मात्र आधीच शेकडो प्रकारच्या भेदाभेदांनी ग्रासलेल्या भारतीय समाजात आणखी एका भेदाला कारणीभूत ठरणाऱ्या शाकाहारविरुद्ध मांसाहार या वादाला आपल्या नव्या पिढीने तरी मूठमाती दिली पाहिजे.
धावत लोकल पकडल्यामुळे दम लागलेल्या एका मुलीला, माझ्या आईने पाणी दिलं, तर त्याही स्थितीत तिने, तुमच्या घरी नॉनव्हेज बनतं का, विचारलं आणि बनतं म्हटल्यावर पाणी घेणं नाकारलं. हा प्रसंग वरपांगी आम्हालाही हास्यास्पद वाटला, पण ही शुद्धाशुद्धतेची भावना जाऊन, मला मांसाहार आवडत नाही, म्हणून मला नको, असे म्हणणारी सामाजिक मानसिकता तयार व्हायला हवीच. त्यासाठीच मांसाहार हा ‘शीsss’ आहे, ही भावना आधी मांसाहारींनी सोडायला हवी. नेहमी मांसाहार करणारे देवाच्या नावे शाकाहार का करतात, हेच मला कळत नाही. मांसाहार पचायला जड असतो, म्हणून उपवासाला तो करत नाहीत, असा युक्तिवाद करणाऱ्यांना मला सांगावंसं वाटतं की, बासुंदी-पुरी या शुद्ध शाकाहारापेक्षाही बोंबलाचं सार आणि भात पचायला हलकं असतं रे. आणि पचायला जड असणारं अन्नच तामसी मानायला हवं. त्यात शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद कशाला!
शाकाहार किंवा एकंदरीतच आहाराबाबतच्या अनाठायी दुराग्रहामुळे आपण आजवर अनेक महनीय व्यक्ती गमावून बसलो आहोत. पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, प्रत्यक्ष डॉक्टरी करायला सुरुवात करण्यापूर्वीच ऐन तारुण्यात गेल्या. त्यामागे प्रमुख कारण होतं, ते अमेरिकेच्या वातावरणात आवश्यक तो आहार बदल न करण्याचा दुराग्रह. तीच कथा रामानुज यांच्यासारख्या थोर गणितज्ज्ञाची. अहो, निम्मी पेशवाई केवळ क्षयाने खोकून खोकून गारद झाली. शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात आहार न मिळणे किंवा खाल्लेले अंगाला न लागणे, ही क्षयाची कारणे आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना. माझ्या एका मित्राचा मुलगा खेळून आल्यावर अचानक बेशुद्ध झाल्यासारखा पडला, त्याला गदागदा हलवून उठवावं लागलं. डॉक्टरने सांगितले की, याला किमान अंडी तरी खाऊ घालत जा. शरीराला आवश्यक तितकं त्याला शाकाहारी आहारातून मिळताच नाहीये. शेवटी शाकाहाराचा दुराग्रह बाजूला ठेवून त्याला अंड्याचा खुराक सुरू करण्यात आला.
शाकाहार हे पूर्णांन नाहीये, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण शरीराला आवश्यक उष्मांक, प्रथिनं आणि अन्य घटक मिळण्यासाठी योग्य ते आणि योग्य त्या प्रमाणात शाकाहारी पदार्थ आपण खातो किंवा खाऊ शकतो का, हा प्रश्न आहे. मोठ्यांना तुम्ही आग्रह करू शकाल, लहान मुलं पेलाभर दूधही तुमच्या सांगण्यावरून नियमित पितीलच असं नाही. त्याऐवजी अंड्याच ऑम्लेट ते आवडीने खाणार असतील, तर केवळ शाकाहाराच्या दुराग्रहापायी त्याला या अन्नापासून दूर ठेवायचं का, हाही विचार केला पाहिजे.
शाकाहारी सगळेच पदार्थ चांगले आणि मांसाहारी वाईट, ही अंधश्रद्धा आहे. अफू, गांजा, तंबाखू, भांग हे काय मांसाहारी पदार्थ आहेत का? म्हटलं तर झाडपालाच ना हा सगळा? पण तो शरीरासाठी घातक म्हणून आपण त्याज्यच ठरवतो ना. एकंदरच खाद्य काय, अखाद्य काय, हे आपल्याला काय पचतं किंवा आपल्या जीवनशैलीनुसार आपल्या शरीराला काय आवश्यक, काय चवीचं, त्यानुसार ठरवलं पाहिजे. केवळ सोवळ्या – ओवळ्याच्या श्रद्धांपायी उत्तम चवी आणि दर्जेदार खाद्य दूर लोटण्यात काय हशील? किमान आपण अखाद्य ठरवलेल्या गोष्टी इतरांसाठी खाद्य असल्या, तर त्याबाबत घृणा बाळगण्याचं तरी काही कारण नाही.
September 27, 2019 — magnon