पशू आणि मानव समूह करून राहतात. त्यांच्यात परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट, विचार समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम (सामान्यतः आणि व्यापकपणे) वापरलं जातं ते म्हणजे भाषा. ह्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी, चित्र, शिल्प वगैरे या सगळ्याचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम कसा झाला हे काही अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. काहीजण म्हणतात की सुरूवातीला चित्रलिपी होती आणि त्याची परिणती हळूहळू फोनेटिक भाषेत झाली. जगभरात आजमितीला साधारण सात हजार भाषा बोलल्या जातात असा एक अंदाज आहे. त्यापैकी अंदाजे ७८० भाषा भारतात बोलल्या जातात. हा अंदाज ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांच्या संशोधनावर आधारलेला आहे. ह्या इतक्या भाषांपैकी २२ भाषा प्रमुख मानल्या जातात. त्यापैकी मराठी ही देशभरात चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. साधारणपणे १०-११ कोटी इतकी जनता मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात करत असते. हा इतका मोठा वर्ग मराठी या भाषेचा वापर जरी करत असला तरीही “मराठीचा जीव घुसमटतोय”, “मराठीचा टक्का घसरतोय”, “मराठी शाळा बंद का होतात” वगैरे आरोळ्या आणि प्रश्न का ठोकले आणि ठाकले जातात?
ह्यामागे खरी बरीच कारणं आहेत. आणि ही कारणं सामाजिक-राजकीय-आर्थिक स्वरूपाची आहेत. खरंतर ही अशी आरोळी तब्बल ९० वर्षांपूर्वी देखील उठली होती. इतिहासाचार्य राजवाडे यांनी १९२६मध्ये मराठी भाषा मुमुर्षू आहे का असा प्रश्न विचारला होता. त्यांचा लेख हा मराठी भाषेविषयी, तिच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारा होता. सुशिक्षित मराठी वर्ग इंग्रजीत शिकतो, पत्रव्यवहारासाठीही मातृभाषेपेक्षा इंग्रजीलाच जवळ करतो. अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषा ही केवळ घरापुरतीच आणि जुजबी संभाषणापुरतीच मर्यादित राहील की काय अशी चिंता राजवाडे यांनी त्या लेखामध्ये व्यक्त केली होती. आज ९० वर्षांनंतरही ही भाषा जीवंत आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याचवेळी राजवाडे यांनी जो प्रश्न ९० वर्षांपूर्वी उपस्थित केला होता, तो आजही कायम आहे.
डॉ. गणेश देवी यांच्या सहभागाने प्रसिद्ध झालेलं पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया हे अभ्यासपूर्ण संशोधन एक महत्त्वाचा उलगडा करतं. भारतातल्या ७८० भाषांपैकी ४०० भाषा ह्या येत्या ५० वर्षांत लोप पावण्याची भीती ह्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी मराठीसहित हिंदी, तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, बंगाली, पंजाबी, गुजराती यासारख्या भाषांच्या अस्तित्वाला धोका नाही असा दिलासादायक निष्कर्षही त्यात काढण्यात आला आहे. या भाषांसमोर इंग्रजीचं तगडं आव्हान असलं तरी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार नाही असं हे सर्वेक्षण सांगतं. ह्याचं कारण देताना संशोधन असं म्हणतं की ह्या भाषांमधून प्रसिद्ध होणाऱ्या संगीत, शिक्षण, सिनेमे आणि प्रसारमाध्यमे यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच ह्या भाषा टिकून राहतील.
ज्या भाषा लोप पावू शकतील त्यातील सर्वाधिक भाषा या किनारपट्टी भागांमधल्या आहेत. या भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण हे पूर्णपणे व्यावहारिक आहे. किनारपट्टीवरील मुख्य वस्ती ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी आणि तत्सम व्यवसाय करते. मात्र अत्याधुनिक तंत्राचा वापर करत मासेमारी करणाऱ्यांमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पोटावर पाय येत आहे. परिणामी ही मंडळी व्यवसाय, नोकरीच्या शोधात किनारपट्टीपासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेच्या चलनवलनावर परिणाम होत आहे असं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे.
ह्याचा अर्थ असा की, केवळ साहित्य, संभाषण यांच्याच आधारावर आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हे कुठल्याही भाषेसाठी कठीण आहे. रोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये भाषेची जोड असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ कुठलीही भाषा ही पैशांची भाषा झाली की तिच्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीसा होतो. त्यामुळेच जर का मराठी भाषेबद्दल ९० वर्षांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक द्यायचं असेल तर ही भाषा व्यवहाराची भाषा म्हणून टिकवणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधे राजभाषेचा दर्जा प्राप्त असणारी आपली मातृभाषा ही तेव्हाच संवर्धित होईल जेव्हा आर्थिक व्यवहारांमध्ये तिचा कायम वापर असेल.
काळाच्या ओघात भाषाही बदलते हे वास्तव आहे. आणि भाषेने काळाच्या सोबतीनेच जायला हवं हेही तितकंच खरं आहे. पण ते होत असताना येऊ घातलेले बदल हे आपलं स्वत्व राखून अंगीकारले पाहिजेत. उदाहरणार्थ – चिनी भाषा जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. चीनची लोकसंख्या जास्त म्हणून ती भाषा सर्वाधिक बोलली जाते असा खुळचट युक्तीवाद होऊ शकतो. पण तो निरर्थक ठरेल. ही भाषा इतक्या मोठ्या प्रमाणावर का बोलली जाते आणि काळाच्या ओघातही या भाषेवर इतर कुठल्या भाषेचं आक्रमण किंवा प्रभाव का पडला नाही याचं कारण रंजक आहे. इंग्रजीतल्या कुठल्याही शब्दासाठी, अगदी विशेषनामासाठीही चिनी प्रतिशब्द तयार केला जातो. विशेष म्हणजे हा प्रतिशब्द चिनी लोकांपर्यंत पोहोचवला जातो आणि प्रचलितही केला जातो. भाषा संवर्धन आणि वृद्धिंगत करण्याचं हे असं काम ज्या ज्या भाषांमध्ये चालतं त्या भाषा स्वतःच्या अस्तित्वाची छाप पाडतात.
आजच्या जागतिक मातृभाषा दिनी आणि येऊ घातलेल्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपण आपल्या भाषेशी प्रामाणिक राहण्याचं वचन तरी स्वतःला देऊ शकतो. शक्य तिथे आणि शक्य तितके मराठी शब्द वापरत राहण्याची प्रतिज्ञा घेऊ शकतो. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्यासारख्या संतांपासून ते सावरकर, कुसुमाग्रज यांच्यासारख्या साहित्यिकांपर्यंत प्रत्येकाने ही मराठी भाषा घडवली आहे. हा वारसा असाच पुढे चालू ठेवण्याचं महत्कार्य आपण प्रत्येकाने आपापल्या परीने केलं पाहिजे.
मराठीविषयी थोडक्यात
– मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे.
– भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे.
– महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
– मराठी ही जगातील पंधरावी आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.
मराठीच्या बोलीभाषा
अहिराणी (जळगाव, बुलढाणा, मलकापूर, बऱ्हाणपूर, शहापूर),
इस्रायली मराठी,
कोंकणी (मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, )
कोल्हापुरी (कोल्हापूर),
खानदेशी
चंदगडी (कर्नाटक, महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेश), चित्पावनी
झाडीबोली (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा भूप्रदेश झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. तिथली भाषा)
डांगी, तंजावर
तावडी (जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल)
देहवाली (भिल्ल समाजात ही बोली आढळते.)
नंदभाषा (व्यापारी भाषा ही सांकेतिक भाषा)
नागपुरी (नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग, भंडारा, गोंदिया)
बेळगावी (बेळगावची बोलीभाषा, कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोंकणी यांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली)
भटक्या विमुक्त
मराठवाडी (महाराष्ट्र-कर्नाटक या सीमावर्ती भागातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बोली)
मालवणी (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग)
व्हराडी (बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा)
February 20, 2018 — magnon