सकाळी सकाळी पेपर हातात घेतला आणि बंड्याचं तोंड अगदी कडू कडू झालं. पहिल्याच पानावर प्रसिद्ध टीव्ही चॅनेलची जाहिरात होती, आकडे आणि स, ला, ते वगैरे प्रत्यय लावल्यामुळे जाहिरात म्हणावी इतपतच मराठी होतं. ते हिंदीमिश्रित मराठी वाचून बंड्याचा त्याचा आवडता कार्यक्रम पाहण्याचा मूडच गेला.
म्हणजे एखादं उत्पादन असतं खास तुमच्या मातीतलं, तुमच्या आवडीचं, तुमच्या भाषेतलं.. पण त्यावरच्या चकचकीतपणावर एखाद्याच शब्दानं बोळा फिरवलेला असतो. तुम्हीही अशा जाहिराती विविध माध्यमांतून, विविध ठिकाणी नक्कीच पाहिलेल्या असणार आणि आत्ता तुम्हाला त्या आठवल्याही असणार. बंड्याचं झालं अगदी तसंच.
गाण्यांच्या सुरेल कार्यक्रमात किंवा डेलीसोपमध्ये जाहिरात लागते, हेच मुळात आपल्या मायबाप प्रेक्षकांना आवडत नाही. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कंटेट पाहणाऱ्यांचीही तीच व्यथा असते. पण लागलीच जाहिरात, तर ती पाहावी म्हणून त्यात लक्ष घालावं, तर क्षणात अक्षरं झळकतात – `गुडी पाडव्याच्या शुभेच्छा’, नाहीतर – `अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा’. हो, हो बंड्याचं होतं तसंच समस्त मायबाप प्रेक्षकांना वाईट वाटत असणार. मग कुणीतरी काकू म्हणतातच, “गुडी नाही रे गुढी पाडवा..’’. नाहीतर एखादा भाषेचा विद्यार्थी ओरडणार, “अक्षय्य तृतीया रे…’’
आपले सण, त्यामागची संस्कृती ही प्रत्येकालाच प्रिय असते. तिचा आब आपण राखतोच. पण तो दुसऱ्यानेही राखला तर आपल्याला आवडतंच. पण जेव्हा त्यातली सरमिसळ कानावर पडते तेव्हा मात्र ते नकोसं वाटतं.. हे नकोसं वाटणं ग्राहकाला थेट उत्पादनापासून तोडू शकतं, याचंही भान आज उत्पादकांना आलेलं आहे.
साधारण 2010 पर्यंत उत्पादकांकडे ग्राहकांपर्यंत पोचण्याची वर्तमानपत्र आणि मर्यादित टीव्ही चॅनेल्सवरच्या जाहिराती इतकीच साधनं होती. टीव्ही चॅनेल असेल तर ठरावीक जाहिराती आणि वर्तमानपत्र असेल, तर मर्यादित शब्दांमधल्या जाहिराती किंवा मुलाखतवजा जाहिराती केल्या जात असत. पण 2010 ते 2018 या काळात इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. 2020 च्या अखेरीस मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 70 कोटी झाली आहे. महाराष्ट्र राज्य इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये अग्रेसर आहे. यापाठोपाठ तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांचा क्रमांक येतो. एका छोट्याशा स्मार्टफोनने इंटरनेट देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आहे. याचं महत्त्व उत्पादक कसं नाकारू शकतील?
आज अनेक अॅप्लिकेशन्समधून हॅप्पी मकरसंक्रांत, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी बैलपोळा असे संदेश सहजगत्या फिरत असले, तरीही `तिळगूळ घ्या गोड गोड बोला’, `दिव्यांच्या सणांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा’ मनाला गारवा देऊन जातातच. कारण या चार शब्दांना आपल्या मातीचा गंध असतो. त्यातला भाव आपल्याला भिडत असतो. म्हणूनच इथं आवर्जून सांगावंसं वाटतं, की UI वर स्थानिक भाषेत मजकूर असेल तर त्याला नक्कीच पसंती लाभते, ही बाब अभ्यासातून समोर आलेली आहे.
आज अनेक जाहिराती क्रिएटिव्ह झाल्या आहेत. तसा विचार करणारी माणसं खास करून नेमण्यात आलेली आहेत. म्हणूनच ट्रॅक्टरची जाहिरात एखाद्या प्रोफेशनल मॉडेलकडे जाण्याऐवजी त्याच मातीतल्या रांगड्या तरुणाकडे, मिशीला पीळ घालणाऱ्या आजोबांकडे किंवा छोट्या पैलवानाकडे जाते आणि लोकांची त्याला पसंतीही मिळते.
भाषा कोसावर बदलते म्हणतात तेही खरंच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते. पण ती एकसारखी बोलली जाते का? तर अजिबातच नाही. मुंबई-पुण्याची शहरी प्रमाण भाषा वेगळी, विदर्भाकडची वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातली तर आणखी वेगळी. जितके प्रदेश तितक्या भाषा ऐकायला येतात. प्रत्येक बोलीभाषेचा ठसका, लहेजा वेगळा असतो. आजकाल तोही बऱ्याच प्रमाणात सिनेमा आणि मालिकांमध्ये उचलायचा प्रयत्न केला जातो. याचं कारण म्हणजे या सगळ्या प्रांतातला संभाव्य ग्राहकवर्ग.
म्हणूनच `पुणेरी पाट्या’, `कोल्हापुरी तांबडा-पाढरा’, `नागपुरचे तर्री पोहे’, `पैठणच्या पैठणी साड्या’.. अशी अनेक प्रांतनिहाय वैशिष्ट्ये भरभर इंटरनेटवर व्हायरल झाली. अनेक लोकप्रिय वाक्यांची मीम्स झाली, त्यापैकी काही टी-शर्टवर अवतरली आणि अनेक तरुण-तरुणींची शान झाली. उत्पादकांकडे विविधांगी वयोगटाचा ग्राहकाधार वाढला. खरं तर, लोकल ग्लोबल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पण ग्लोबल ब्रँड्सही जेव्हा लोकल म्हणजे प्रादेशिक होतात ते खरं त्या भाषेचं आणि ती भाषा बोलणाऱ्या ग्राहकाचं यश असतं. यात अनेक मोठ्या ब्रँड्सचाही समावेश आहे. अगदी पेप्सी, कोकाकोला, बिसलेरी, कॅडबरी, हल्दीराम, अॅमेझॉन, नेसले अशा एक ना अनेक ब्रँडची नावं घेता येतील. यासारख्या अनेक ब्रँड्सनी आपला प्रादेशिक ग्राहकाधार ओळखला आणि त्यानुसार त्या त्या भाषांचा अंगिकारही केला. मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये त्यांच्या ऑडिओ-व्हिडिओ जाहिराती आज अनेक टीव्ही चॅनेल्सवर दिसतात.
पण इंटरनेटमुळे एक संधी आणखी वाढली. एका राज्यातले रहिवासी कामानिमित्त दुसऱ्या राज्यात, देशांत स्थलांतरित होतच असतात. जेव्हा इंटरनेटच काय फोनही नव्हते त्याही काळात ही स्थलांतरं होतच होती आणि तीही आतासारखीच आपल्या संस्कृतीसह केली जायची. स्थलांतरित होणारा प्रत्येक जण आपलं खान-पान, वेशभूषा, वाचनसंस्कृती आपल्यासोबत नेत असतो. प्रांतनिहाय विकसित झालेल्या आवडी-निवडीसुद्धा यात येतात. आज फरक फक्त इतकाच आहे, की या स्थलांतरित व्यक्तीही उत्पादकांचा ग्राहकाधार असू शकतात. महाराष्ट्रात मराठी बोलणारा ग्राहक असतो तसाच तो परदेशात स्थायिक झालेलाही असू शकतो.
म्हणूनच दुधा-तुपापासूनचे अनेक खाण्याचे पदार्थ, अगदी पाणीपुरीसुद्धा परदेशात जाते, भाषांतरित होऊन पुस्तकं तिकडची इकडे आणि इकडची तिकडे येतात, कपडालत्ता, दागदागिने ग्राहकाच्या मातीतलं, त्याला आवडणारं, मराठमोळेपणा जपणारं घडवलं जातं आणि ग्राहकापर्यंत ते पोचवलं जातं.
इंटरनेटमुळे ग्राहक जवळ आलाय हे खरं आहे. हा सर्वदूर पसरलेला ग्राहकाधार जवळ आणण्यासाठी प्रांतनिहाय भाषा आपल्याशा केल्या हेही खरंय. पण आज या भाषेलाही जपण्याची वेळ आलेली आहे. ग्राहकाकडे निवडीचे अनेक पर्याय आहेत. त्याच्या भाषेत मजकूर किंवा उत्पादन पोचवायचं तर ते योग्य, अचूक हवं याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
लोकलायझेशन क्षेत्रात याच कामावर अधिक भर दिला जातो. तुमच्या ग्राहकाला नेमकं काय आवडतं याबरोबर त्याला ते कसं रूचतं हे ओळखून काम केलं जातं. नीटनेटकी, सोपी, कोणत्याही गटातील वयोगटाला सहज समजेल अशी सोपी भाषा असणं, गरज नसेल तर फार अलंकारिकता टाळणं, साध्या व्याकरणातल्या चुका टाळणं, एखाद्या भाषेचा लहेजा किंवा शैली जपणं, दुसऱ्या भाषेतून भाषांतरित केल्यासारखा मजूकर न देणं अशा अनेक गोष्टी लोकलायझेशन क्षेत्रात काम करताना लक्षात ठेवल्या जातात. यामुळेच उत्पादकाला नेमकं काय ग्राहकापर्यंत पोचवायचं आहे ते त्या त्या भाषेत योग्य प्रकारे पोचवलं जातं.
April 26, 2021 — magnon